
NT NEWS 24 पिंपळनेर (प्रतिनिधी):
पिंपळनेर हद्दीतील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना परिसरात असलेला BSNL चा टावर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, मनसेचे माढा तालुका अध्यक्ष सुभाष बापू खटके यांनी येत्या पाच दिवसांत सेवा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे:
या गंभीर समस्येबाबत सुभाष बापू खटके यांनी टेंभूर्णी डिव्हिजनसह सोलापूर जिल्ह्याचे महाव्यवस्थापक (GM) यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, “लाईट बंद केली आहे” अशी तांत्रिक कारणे पुढे करून अधिकारी वेळ मारून नेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून ही सेवा विस्कळीत असून अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप खटके यांनी केला आहे.
जनतेची गैरसोय आणि संताप:
विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना हा वर्दळीचा आणि महत्त्वाचा परिसर आहे. येथे शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांची संख्या मोठी आहे. मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे डिजिटल व्यवहार, ऑनलाइन शिक्षण आणि आपत्कालीन संपर्क यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. “अधिकारी केवळ पगाराचे मालक झाले आहेत, त्यांना जनतेच्या समस्यांशी काहीही देणेघेणे उरलेले नाही,” अशा तिखट शब्दांत सुभाष बापू खटके यांनी आपला संताप व्यक्त केला.
५ दिवसांचा अल्टिमेटम:
प्रशासनाने नागरिकांची होणारी ही गैरसोय तातडीने दूर करावी. जर येत्या ५ दिवसांच्या आत हा टावर सुरू होऊन नेटवर्क सेवा सुरळीत झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यामुळे आता BSNL प्रशासन खडबडून जागे होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Author: Bhayyasaheb Kambale
NT NEWS 24
