
NT NEWS 24 प्रतिनिधी – पिंपळनेर :
मा.श्री.रणजितसिंह शिंदे व सौ.प्रणिताताई शिंदे यांच्या हस्ते महापूजा व अभिषेक
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेला ‘श्री गुरुदत्त जन्मोत्सव आणि अखंड हरिनाम सप्ताह’ आज, दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दिनांक २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरू असलेल्या या सप्ताहाची सांगता आज श्री दत्त जयंतीनिमित्त महापूजेने करण्यात आली.
गेल्या आठवडाभरापासून कारखाना साईटवर श्री गुरुचरित्र गाथा पारायण आणि अखंड हरिनाम सोहळा सुरू असल्याने संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या आणि दत्तगुरूंच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. या पवित्र सप्ताहाची सांगता आज पहाटेच्या विशेष धार्मिक कार्यक्रमांनी झाली.
आज 7:00 वाजता कारखान्याचे मार्गदर्शक मा. श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. प्रणिताताई रणजितसिंह शिंदे यांच्या शुभहस्ते श्रींची विधिवत अभिषेक पूजा संपन्न झाली. यावेळी शिंदे दांपत्याने श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन कारखान्याच्या आणि परिसराच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली.
या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री. पी. एस. येलपले, चीफ इंजिनियर श्री. एस. डी. कैचे, कामगार प्रतिनिधी श्री. अनिल वीर, ऊस विकास अधिकारी श्री. लगड, शेतकी अधिकारी श्री. जगताप आणि सुरक्षा अधिकारी श्री. रावळ यांच्यासह कारखान्यातील विविध विभागांचे प्रमुख, कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सप्ताहभरात झालेले विविध धार्मिक कार्यक्रम आणि आजचा जन्मोत्सव सोहळा यामुळे कारखाना परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Author: Bhayyasaheb Kambale
NT NEWS 24
