गुटख्याची जागा घेतली ‘माव्याने’; टेंभुर्णीची तरुण पिढी कॅन्सरच्या विळख्यात!

SHARE:

टेंभुर्णी | प्रतिनिधी:

टेंभुर्णी शहरात सध्या गुटख्यावर बंदी असली, तरी त्याला पर्याय म्हणून आलेल्या ‘सुक्या माव्याने’ शहरात धुमाकूळ घातला आहे. अवघ्या २५ रुपयांना मिळणारी ही माव्याची पुडी तरुणाईच्या जीवावर उठली असून, या रासायनिक माव्याच्या सेवनामुळे आतापर्यंत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सध्या सात ते आठ तरुण तोंडाच्या कॅन्सरने (कर्करोग) ग्रस्त असून त्यांच्यावर बार्शी येथील कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौकाचौकात मृत्यूचे जाळे

शहरातील प्रत्येक चौकात, किराणा दुकान, स्टेशनरी आणि पानटपरीवर हा मावा छुप्या व उघड मार्गाने विक्री केला जात आहे. सुगंधी तंबाखू, चुना आणि बंदी असलेली विविध केमिकल्स वापरून हा मावा तयार केला जातो. चवीला सुगंधी वाटणारा हा पदार्थ प्रत्यक्षात ‘स्लो पॉयझन’ ठरत आहे. सततच्या सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर, घसा आणि अन्ननलिकेचे आजार बळावत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

लाखोंची अवैध उलाढाल

टेंभुर्णी शहरात ५ ते ६ मोठे गुटखा विक्रेते असून ४ ते ५ ठिकाणी सुका मावा तयार केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार:

दैनिक विक्री: दररोज १०० ते १५० किलो मावा तयार केला जातो.

किंमत: घाऊक विक्रेते ८०० ते १००० रुपये किलो दराने किरकोळ विक्रेत्यांना मावा देतात.

नफा: किरकोळ विक्रेते एका किलोतून ५२ ते ५५ पुड्या तयार करून जवळपास ३०० ते ४०० रुपये नफा कमवतात.

उलाढाल: शहरात दरमहा ४० ते ५० लाख रुपयांची अवैध उलाढाल या व्यवसायातून होत आहे.

नशेकडे तरुणांचा ओढा

सुपारी, चिंचोके पावडर आणि घातक सुगंधी रसायनांच्या मिश्रणामुळे या माव्याला एक वेगळीच नशा चढते. यामुळे शहरातील कामगार वर्ग आणि विशेषतः महाविद्यालयीन तरुण या व्यसनाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत. काही तरुणांना तर या व्यसनामुळे कायमचे अपंगत्व आले असून त्यांचे हसते-खेळते आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.

प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

तीन वर्षांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने यावर काही प्रमाणात कारवाई केली होती. मात्र, काही दिवसांतच हे सत्र पुन्हा जोमाने सुरू झाले आहे. प्रशासनाने याकडे केवळ ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष न करता, कठोर पावले उचलून हा अवैध व्यवसाय कायमचा बंद करावा, अशी मागणी आता टेंभुर्णीतील संतप्त नागरिकांकडून होत आहे.

आरोग्य इशारा: माव्यातील घातक रसायने थेट पेशींवर परिणाम करतात, ज्यामुळे तोंडाचा जबडा लॉक होणे आणि पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याचा धोका असतो. वेळीच सावध व्हा!

Bhayyasaheb Kambale
Author: Bhayyasaheb Kambale

NT NEWS 24

Leave a Comment