NT NEWS 24 – प्रतिनिधी
टेंभुर्णी:
येथील गजबजलेल्या करमाळा चौक परिसरात मंगळवारी (१९ मे) सायंकाळच्या सुमारास एका व्यावसायिक दुकानाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचरचे दुकान जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार दुकानदाराचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीच्या या रौद्ररूपामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
सायंकाळी घडली घटना; धुराचे लोट हवेत
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ७:५० च्या सुमारास करमाळा चौक परिसरातील एका दुकानातून अचानक धूर निघताना नागरिकांना दिसला. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि दुकानातील हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्सचे साहित्य तसेच फर्निचरने पेट घेतला. दुकानात प्लायवूड, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने आग वेगाने पसरली आणि संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आकाशात धुराचे मोठे लोट उसळल्याने दूरवरूनही आगीची भीषणता दिसून येत होती.
नागरिकांची गर्दी अन् पोलिसांची धावपळ
आग लागल्याचे समजताच आजूबाजूच्या व्यापाऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली. काही जागरूक नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दल आणि पोलिसांशी संपर्क साधला. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकांना बाजूला हटवले.
लाखोंचे नुकसान, कारण अस्पष्ट
या भीषण आगीत दुकानातील संपूर्ण फर्निचर, महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि हार्डवेअरचे साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु व्यापाऱ्याचे लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणाने, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस आणि संबंधित प्रशासनाकडून आगीच्या अचूक कारणाचा तपास सुरू आहे.
Author: Bhayyasaheb Kambale
NT NEWS 24
