
प्रतिनिधी पुणे:
पुणे आणि परिसरात विषारी दारूमुळे अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. फुगेवाडी आणि हडपसर परिसरामध्ये विषारी दारू प्राशन केल्यामुळे अवघ्या २४ तासांच्या आत तब्बल १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
या भीषण दुर्घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत मुख्य आरोपी योगेश वानखेडे याला अटक केली आहे. विषारी दारूची निर्मिती आणि विक्री करण्यामागे त्याचा मुख्य हात असल्याचा संशय असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
२४ तासांत १३ निष्पापांचे बळी
मिळालेल्या माहितीनुसार, फुगेवाडी आणि हडपसर येथील स्थानिक नागरिकांनी या विषारी दारूचे प्राशन केले होते. दारू प्यायल्यानंतर काही वेळातच अनेकांची प्रकृती खालावली. उलट्या, डोळ्यांसमोर अंधारी येणे आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विषबाधा अत्यंत तीव्र असल्याने उपचारादरम्यान २४ तासांच्या आत १३ जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास आणि कारवाई
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ‘क्राइम सीन’ सील केला आहे. आरोपी योगेश वानखेडे हा ही दारू कुठून आणत होता, यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, आणि अवैध दारूचे हे जाळे कुठे कुठे पसरले आहे, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.
अशा बेकायदेशीर आणि विषारी दारूविक्रेत्यांवर कठोरत पावले उचलण्याची मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
Author: Bhayyasaheb Kambale
NT NEWS 24
