पुणे-सोलापूर महामार्गावरील दरोडा: टेंभुर्णी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, अवघ्या ४८ तासांत टोळी गजाआड!

SHARE:

NT NEWS 24 प्रतिनिधी टेंभुर्णी

₹१०.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.

टेंभुर्णी (प्रतिनिधी):

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री कांदा व्यापाऱ्यांना बेदम मारहाण करून वाहन आणि मुद्देमाल लुटणाऱ्या एका सराईत टोळीचा टेंभुर्णी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Team) अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी ४ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चोरीस गेलेली नवीन महिंद्रा बोलेरो पिकअप आणि कांद्याची पोती असा एकूण १० लाख ३२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महामार्गावर चालकाला मारहाण अन् लूट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नामदेव नांदे (रा. वीरवाडी, मदनवाडी, ता. इंदापूर) आणि त्यांचे चुलत भाऊ तानाजी नांदे (रा. राजेवाडी, ता. दौंड) हे आपल्या शेतातील कांदा दोन नवीन महिंद्रा बोलेरो पिकअप गाड्यांमध्ये भरून सोलापूर बाजार समितीकडे विक्रीसाठी निघाले होते.

१८ जून रोजी रात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास, टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापटने शिवारात (राजस्थान ढाब्यापासून ३ किमी अंतरावर) एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी कांदा व्यापाऱ्यांची पिकअप अडवली. “तुला गाडी नीट चालवता येत नाही,” असा बहाणा करत त्यांनी गाडी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर चालकाला आणि शेतकरी शिवाजी नांदे यांना बेदम मारहाण करत, त्यांच्याकडील ४३ पोती कांदा, नवीन महिंद्रा बोलेरो पिकअप, मोबाईल फोन आणि कागदपत्रांची बॅग असा एकूण १० लाख ३४ हजार ३५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून नेला.

या घटनेप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४१६/२०२६ नुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘फास्टॅग’ काढला, तरी पोलिसांना गुंगारा देता आला नाही!

घटनेचे गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान पोलिसांना उजनी धरणाजवळील झुडपात लुटलेली कांद्याची पोती सापडली. मात्र, आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पिकअप गाडीचा ‘फास्टॅग’ (FASTag) काढून टाकला होता, ज्यामुळे तांत्रिक तपासात मोठी अडचण निर्माण झाली होती.

‘डीबी’ पथकाची गुप्त मोहीम आणि अटक

कोणताही ठोस पुरावा नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) संदेश बावकर यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथकाने भिमानगर, रांजणी, हिंगणगाव, तरटगाव, कांदलगाव परिसरात गुप्त माहितीदार सक्रिय केले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटकेतील आरोपींची नावे:

प्रणित उर्फ नन्या संजय गायकवाड (वय २१, रा. रांजणी, ता. माढा)

शाहरूख उर्फ श-या राजू शेख (वय २१, रा. भिमानगर, ता. माढा)

अथर्व उर्फ चिकास सोमनाथ खानेवाले (वय १९, मूळ रा. आजोती, ता. इंदापूर)

संदेश उर्फ नवा सुभाष भोसले (वय १९, रा. बाभुळगाव, ता. इंदापूर)

या सराईत टोळीने महामार्गावर यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

तपास पथकाचे कौतुक

ही धडाकेबाज कामगिरी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदेश बावकर, अंमलदार विलास नलवडे, संदीप गिरमकर, मोहन तळेकर, सूरज मुलाणी, हनुमंत देवकर, समाधान धोत्रे तसेच सोलापूर सायबर विभागाचे व्यंकटेश मोरे यांनी बजावली. अवघ्या दोन दिवसांत दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Bhayyasaheb Kambale
Author: Bhayyasaheb Kambale

NT NEWS 24

Leave a Comment